पीक विमा कंपनी उठली शेतकऱ्यांच्या जीवावर !  #पीकविमा2022 #रविकांततुपकर #स्वाभिमानीशेतकरी

पीक विमा कंपनी उठली शेतकऱ्यांच्या जीवावर ! #पीकविमा2022 #रविकांततुपकर #स्वाभिमानीशेतकरी

पिकविमा कंपनीने अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात अत्यंत तोकडी रक्कम जमा केल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे. दुसरीकडे सदर कंपनी कृषी विभागाला देखील सहकार्य करत नसल्याने बुलढाणा जिल्हा कृषी अधीक्षकांनी या कंपनीच्या विरोधात बुलढाणा पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. त्याचा राग शेतकऱ्यांवर काढण्याचा डाव ही कंपनी रचत आहे. एआयसी अर्थात भारतीय कृषी विमा कंपनीकडे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांचे काम आहे. या कंपनीने कृषी विभागाचे पंचनामे ग्राह्य न धरता, कृषी सहाय्यांची सही नसलेले पंचनामे परस्पर दाखल केल्याने शेतकऱ्यांना अत्यंत कमी मोबदला मिळाला आहे. प्रिमियम पेक्षाही कमी पैसे मिळाल्याने शेतकरी नाराज झाले आहेत. कृषी विभाग या कंपनीकडे शेतकऱ्यांचे मंजुर केलेले अर्ज मागतात परंतु कंपनीचे प्रतिनिधी अर्ज देत नाही, कृषी विभागाला सहकार्य करत नाही त्यामुळे बुलढाणा कृषी अधीक्षकांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. शेकडो कोटी रुपयांचा घोटाळा या कंपनीने केला आहे. कंपनीने परस्पर मंजुर केलेले अर्ज आणि कृषी विभागाचे पंचनामे समोरासमोर आले, तर कंपनीचे पितळ उघडे पडू शकते परंतु कंपनी 'दूध का दूध, पाणी का पाणी' करण्यास तयार नाही. उलटपक्षी या कंपनीने आता महाराष्ट्रातील सर्व कार्यालये बंद ठेवण्याचा, शेतकऱ्यांचे फोन न घेण्याचा तुघलकी निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. शेतकऱ्यांवर दबाव निर्माण करुन पळ काढण्याचा हा डाव आहे. वास्तविक पाहता शेतकऱ्यांनी प्रिमियमचे पैसे भरलेले आहे, त्यामुळे त्यांच्या हक्काचे पैसे ते मागत आहेत, शिवाय सरकारनेही हजारो कोटी रुपये या कंपनीला दिलेले आहेत. त्यामुळे ही कंपनी शेतकऱ्यांची फसवणूक करण्यासोबतच सरकारचीही फसवणूक करत आहे, असा आरोप शेतकरी नेत्यांकडून होत आहे. ही बाब पाहता सरकारने यामध्ये हस्तक्षेप करुन या कंपनीला शेतकऱ्यांचे पैसे देण्यास बाध्य करणे गरजेचे झाले आहे. अन्यथा शेतकऱ्यांचा रोष उफाळून येऊ शकतो. विमाकंपनी आणि शेतकऱ्यांमध्ये संघर्ष निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू शकतो. कंपनीने कोणताच भ्रष्टाचार केला नसेल तर त्यांनी मंजुर केलेले अर्ज कृषी विभागाकडे द्यावे आणि कृषी विभागाच्या पंचनाम्यांसोबत तुलना करावी यातून सर्व सत्य समोर येणार आहे, मात्र एआयसी कंपनी यासाठी तयार नाही. या कंपनीने शेतकऱ्यांची फसवणूक करुन त्यांचे पैसे बुडविण्याचा प्रयत्न केल्यास आम्ही खपवून घेणार नाही, असा इशाराही रविकांत तुपकर यांनी दिला आहे. एकंदरीत कंपनीची आडमुठी भूमिका, शेतकऱ्यांचा वाढता रोष पाहता पिकविमा कंपनी आणि शेतकरी यांच्यातील संघर्ष टोकाला जाण्याचे संकेत दिसून येत आहेत.